(लघुकथा) मेसेज
निलेश, दोन-तीन दिवसांपासून मी बाबांना फोन करतेय पण ते फोनच उचलत नाहीत. फक्त 'मी ठीक आहे' असा मेसेज पाठवतात. तुझे बाबा पण ना...' नयना म्हणाली तेव्हा निलेशने आश्चर्याने विचारले , 'इतक्या वर्षांनंतर तुला अचानक त्यांना फोन करण्याची गरज का पडली?'
'अरे काही नाही, दोन्ही मुलं आपापल्या आयुष्यात बिझी आहेत आणि माझ्या किटीच्या मैत्रिणीही त्यांच्या फॅमिलीमध्ये बिझी आहेत, म्हणून म्हटलं, चला, बाबांशीच बोलू.''शेवटी, ते दिवसभर रिकामेच असतात, नाही का?'
नीलेश हसला आणि म्हणाला, 'तुला कोणी सांगितलं ते रिकामे बसले आहेत म्हणून. आपण इथे आल्यानंतर जेव्हा जेव्हा बाबांनी तुला फोन केला तेव्हा तेव्हा तू त्यांचा फोन घेण्याऐवजी नेहमी मेसेज करायचीस की 'मी सध्या व्यस्त आहे, सर्व काही ठीक आहे. तू विचारच केला नाहीस की, त्यांनाही त्यांच्या नातवंडांशी बोलण्याची इच्छा होत असेल. मग त्यांनी गावातीलच गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवण्यात आपलं मन रमवलं.आता त्यांना तुझ्याशी किंवा इतर कोणाशीही फोनवर बोलण्याची गरज पडत नाही.'
ते ऐकून नयना चकित झाली.
तिने नीलेशकडे पाहिलं जो तिच्याकडेच पाहत होता जणू म्हणत होता, त्यात नवल ते काय? तू जे केले तेच तुझ्या वाट्याला आले आहे.-विभा गुप्ता
(अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे)
Comments
Post a Comment