(लघुकथा) टोमणे


सतीया या गरीब शेतकऱ्याची मुलगी नेहा दिल्लीत एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला होती. गावातील मुलीची एम्समध्ये निवड होणे ही खूप अभिमानाची गोष्ट होती. पण गावातील लोकांच्या मनात एक शंका होती.संशय येण्याचे कारण म्हणजे तीन-चार वर्षांपूर्वी गावातील सरपंचाची मुलगी बँक मॅनेजर झाली होती. बँकेच्या प्रशिक्षणादरम्यान तिला एक मॅनेजर मुलगा आवडला. तिथेच त्यांचे लग्न झाले. ती घरी परतलीच नाही हो... पण तिच्या लग्नाची बातमी मात्र नक्कीच आली होती. अशा घटनांच्या भीतीने गावकऱ्यांनी आपल्या मुलींना अधिक शिकवणे जवळपास सोडून दिले होते. 

नेहा एक हुशार मुलगी होती, ती स्वतःच्या हिमतीवर इथपर्यंत पोहोचली होती. 'सतीयाची आता सारी चिंता दूर झाली.' असे म्हणत लोक अनेकदा सतीयाला टोमणे मारायचे. 'डॉक्टर मुलगी नवऱ्याला घेऊनच घरी परतेल' म्हणायचे.

बिचारा सतीया त्यांचे टोमणे ऐकून घ्यायचा आणि गप्प बसायचा. आज सतीयाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मुलगी नेहाने तिच्या धाकट्या भावाच्या मोबाईलवर एक फोटो पोस्ट केला होता, जो पाहून सतीयाचे कुटुंब खूप आनंदी दिसत होते. त्या फोटोवरून टोमणे मारणाऱ्यांच्या गालावर जोरदार चपराक बसली होती. वास्तविक, फोटोमध्ये नेहा दिल्ली रेल्वे स्टेशनवर सामान घेऊन घरी परतण्यासाठी तयार उभी होती, तीही हसतमुख. फोटोच्या खाली 'बाबा, मी येतेय' असा मेसेज लिहिला होता.- गोविन्द भारद्वाज (अनुवाद :मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली)


Comments

Popular posts from this blog

(लघुकथा) मोबाईल

(लघुकथा) मेसेज

मनाची श्रीमंती